अजाण आम्ही तुझी लेकरे तू सर्वांचा पिता
नेमाने तुज नमितो, गातो तुझ्या गुणांच्या कथा
सूर्यचंद्र हे तुझेच देवा, तुझी गुरेंवासरें
तुझीच शेते, सागर, डोंगर, फुले, फळे, पाखरे
अनेक नावे तुला तुझे रे दाही दिशांना घर
करिशी देवा सारखीच तू माया सगळ्यांवर
खूप शिकावे, काम करावे, प्रेम धरावे मनी
हौस एवढी पुरवी देवा हीच एक मागणी
सोसायटीमधील १०-१५ लहान मुले एकत्र येऊन सर्वांसमोर येऊन हे गाणं म्हणतात आणि वातावरण एकदम फुलून जाते आणि मधुकोषचा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम सुरु होतो. ७० च्या आसपास संख्येने उपस्थित नागरिक बंधू भगिनी कॅरम च्या हॉल मध्ये दाटीवाटीने बसतात. समोर श्री दत्तगुरूंची प्रतिमा, गीता, दासबोध, ज्ञानेश्वरी आदी सदावंदनीय असे धर्मग्रंथ, दरवाज्यावर लावलेली सुवासिक मोगऱ्याची माळ, धुपाचा मंद असा सुगंध, सोबत कर्णमधुर शहनाई वातावरण भारून टाकते. आणि त्यात भर पडते ती सोसायटीमधील भजनी मंडळाने (गोखले आजी, कोल्हटकर आजी, जोगळेकर आजी इत्यादीनी) सादर केलेल्या आदी शंकराचार्य रचित 'गुरु अष्टकम्' ची.
शरीरं सुरुपं तथा वा कलत्रं यशश्चारू चित्रं धनं मेरुतुल्यम्
मनश्चेन्न लग्नं गुरोरंघ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम्
गीता, दासबोध यांचे सखोल अध्ययन असलेल्या सौ. कोठारी आजींनी त्यानंतर उपस्थित नागरिकांसमोर भारताचे सख्खे शेजारी श्री दलाई लामा यांचा संपूर्ण जीवनपट उलगडत अनेक नवनवीन गोष्टींचा खजिनाच समोर ठेवला. तिबेट ची संस्कृती, तेथील दलाई लामांचे महत्व, लामांचे लहानपण, गुरुची भेट, हिऱ्याला पैलू पडावे तसे गुरूंनी दिलेल्या शिकवणुकीमुळे त्यांच्या जीवनावर पडलेला प्रभाव व झालेला बदल आदी गोष्टी त्यांनी रंगवून सांगितल्या,
कार्यक्रमाला थोडे वेगळे स्वरूप म्हणून यंदाच्या वर्षांपासून सोसायटीमधील १० वी व १२ वी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा देखील आयोजित करण्यात आला होता. सोसायटीमधून एकूण ४ विद्यार्थी या वर्षी १०/१२ वी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. सोबतच विद्यार्थ्यांचे मनोगत सुद्धा व्यक्त करण्यात आले, यात त्यांनी केलेला अभ्यास, मेहेनत आणि शिस्त याचे महत्व चि. जोशी ने सांगितले.
कार्यक्रमात या नंतर उपस्थित सर्व नागरिकांनी श्री दत्तगुरूंच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून पूजन केले. अतिशय शिस्तीमध्ये सर्व नागरिक हॉल च्या बाहेर आले व प्रसाद आणि चहापानाचा आस्वाद घेत कार्यक्रमाची सांगता झाली.
No comments:
Post a Comment